जबाबदारीचे महत्व भाग १

माणसाचे जीवन ही एक जबाबदारीच आहे. एखाद्या व्यक्तीचा एखाद्या गावात, एखाद्या कुटुंबात, एखाद्या तालुक्यात, जिल्ह्यात किंवा देशात जन्म झाला. म्हणजे तेथील काहीतरी ऋण त्याच्या डोक्यावर असते. कुटुंबाचे, समाजाचे आपण देणे लागतो. त्यांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी झटणे ही आपली जबाबदारी आहे. परमेश्वराने दिलेल्या जीवनाचा सदसद्विवेक बुद्धीने योग्यरीत्या वापर करून स्वतःबरोबरच कुटुंब, समाज यांचाही विकास घडवून आणावा. हेच एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपले उत्तरदायित्व आहे आणि ते आपण चपखलपणे पार पाडावे.आपल्याला जीवन मिळाले म्हणजे विनाकारण नाही, त्यामागे काहीतरी हेतू असेलच त्यादृष्टीने कार्य करीत राहावे. मनुष्यप्राण्याचे जीवनचक्र हे गुंतागुंतीचे व वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्यांनी व्यापलेले असते. माणूस हा शाळेत गेल्या पासून तर नोकरीस लागेपर्यंत अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पडत असतो. या जीवनक्रमात सहसा मनुष्य कमवायला लागल्यानंतर लग्न व त्यानंतर येणाऱ्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत असतो. समाजाच्या दृष्टीने या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे म्हणजे तो व्यक्ती मोठा झाला किंवा समंजस झाला असे संबोधले जाते. मोठे असण्याची जाणीव झाल्यानंतर बऱ्याच माणसात एक अहंभाव निर्माण होतो व‌ हा अहंभाव बराच वेळा त्याच्या वागणुकीतून दीसत असतो. आपण आता मोठे झालो आहोत, या गोष्टीची जाणीव आपल्याला कधी होते? हा प्रश्न जेवढा सहजपणे जर आपण स्वतःला विचारला, आणि जर ह्याचा सखोल विचार केला, तर आत्मपरीक्षण केल्याशिवाय याचे उत्तर देता येणार नाही. आपण मोठे झालो, पण कशाने मोठे झालो. हा विचार करणे जरुरी आहे. माणुस वयाने कितीही मोठा झाला व त्याला फक्त स्वार्थ समजत असेल, फक्त सल्ले देत असेल, फसवणुक करुन लुबाडणूक करीत असेल, कृतीत कमी असेल तर समाजासाठी, आजुबाजूच्या सहकाऱ्यांसाठी त्याचा काही फायदा नाही. तुम्हाला ज्या वेळेस ह्या सर्व गोष्टींची जाणीव होइल, तेव्हाच स्वतःला मोठे झालेले आणि एक जबाबदार व्यक्ती झालेले समजा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या