फास्टफूडचे शरीरावर होणारे परिणाम | The effects of fast food on the body

फास्टफूडचे शरीरावर होणारे परिणाम | The effects of fast food on the body

फास्ट फूडचा परिणाम केवळ पोटावरच नाही तर मेंदूवरही होत असल्याचे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. फास्ट फूडमुळे तुमची अध्ययन क्षमता, स्मृती व मेंदूचे आरोग्य यावर वाईट परिणाम होत असतो, असे हा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले. फास्ट फूडमधील आरोग्यास अपायकारक असलेल्या घटकांमध्ये गेल्या तीन वर्षांत तब्बल 226 टक्क्यांची वाढ झाली आहे, असा खळबळजनक खुलासा अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केला असून, ही आजच्या पिढीसाठी एक अत्यंत गंभीर बाब आहे.फास्ट फूड अधिक  काळ टिकविण्यासाठी त्यात मीठ किंवा साखर जास्त प्रमाणात घातली जाते.  त्यात जीवनसत्वे खनिजे आणि इतर पोषक घटक फार कमी प्रमाणात असतात कारण फास्ट फूडमध्ये भाज्या किंवा फळे नसतात किवा असली तरी जास्त शिजवल्या किंवा तळल्यामुळे त्यातले पोषक अन्नघटक नष्ट झालेले असतात. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे फास्ट फूडमध्ये आरोग्यास उपयुक्त असा चोथा आणि प्रथिने कमी आणि आरोग्यास हानिकारक असणाऱ्या ट्रान्स-फॅट आणि कॅलरीज  मुबलक प्रमाणात असतात.
'फास्ट फूड किल्स फास्ट', 'वन्स ऑन लिप्स फॉरेव्हर ऑन हिप्स', हे आपण नेहमी वाचतो ऐकतो आणि आपल्याला ते पटतेदेखील. बरेचदा हे सारे माहीत असूनही 'अमुक एक पदार्थ पाहिल्यानंतर माझा ताबा राहत नाही. मी तो पदार्थ खातोच,' हेही आपण ऐकतो. हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीत, याचीही लोकांना कल्पना असते, तरीही ते समोर आल्यास त्यांना ते खावेसे वाटत राहते आणि त्यांच्या मेंदूचे यावर नियंत्रण राहू शकत नाही. कधी कधी तर एखादाच घास घ्यायचा, असे ठरविलेले असते; पण पाहता पाहता समोर असलेले पाकिट किंवा फास्टफुड कधी संपते, तेही समजत नाही. हे सारे होते; कारण त्यामागे असलेले तंत्रज्ञान आहे. या साऱ्या पदार्थांची चटक लागण्यामागे विज्ञान आहे.

येथे मीठ, साखर, तेल आणि विविध प्रकारच्या कृत्रिम रासायनिक चवींची मिसळ मोठ्या कौशल्याने केली जाते. बऱ्याच फास्ट फूडमध्ये अजिनोमोटो हा घटक असतो. अजिनोमोटो म्हणजे मोनो सोडियम ग्लुटामेट किंवा चायनीज मीठ. या घटकाचा उपयोग खाद्य पदार्थांची चव वाढविण्यासाठी केला जातो. रेडी टू इट सूप, चिप्स आणि अनेक इतर पदार्थांमध्ये याचा चवीसाठी वापर होतो. अजिनोमोटोमुळे इन्शुलिनचा स्राव वाढतो आणि त्यामुळे जास्त भूक लागते. चीज असे लिहिलेल्या बऱ्याच पदार्थांत ते नावाला असते किंवा नसतेही. त्याऐवजी चीज फ्लेवर वापरले जाते. त्याचीही चटक लागते. चीजसारखे विविध कृत्रिम स्वाद वापरलेले असतात. त्या स्वादांची चटक लागते. काही जणांना अमुक ब्रँडचे किंवा तमुक स्वादाचेच पदार्थ खायचे असतात; कारण त्या गोष्टींची चव त्यांच्या मेंदूमध्ये पक्की झालेली असते. एवढी, की केवळ आठवण झाली, तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटू लागते.

सतत जंकफूडचे सेवन करणार्‍यांमध्ये पचनाचे विकार होण्याची शक्याता अधिक असते. जंक फूडमध्ये पदार्थ तळण्याचे प्रमाण अधिक असते, यामुळे अशा पदार्थांतून आलेले तेल पोटातील आतल्या त्वचेचेवर साचते व पित्ताची निर्मिती होण्यास मदत होते.  जंकफ़ूडमधील मसाले पोटातील त्वचेला हानी पोहचवतात. 

निरोगी शरीरासाठी आवश्यक असलेल्या   प्रोटिन्स, व्हिटामिन्स यासारखी आवश्यक  पोषणद्रव्ये जंकफूडमध्ये नसल्याने शरीराचे कार्य बिघडते. जंकफूडच्या सेवनाने भरपेट खाल्ल्याचे समाधान मिळाले  तरीही  त्यातून शरीराला उर्जा मिळत नाही , त्यामुळे कालांतराने तुम्हाला थकवा जाणवतो. जर तुम्ही ‘जंकफूड’च दुपारचे जेवण केलेत तर यामुळे तुम्हाला दीर्घकालीन थकव्याचा त्रास जाणवू शकतो.  जंकफूडमुळे शरीराला उर्जा मिळत नसल्याने तुम्ही दैनंदिन कामेदेखील उत्साहाने करू शकत नाही.

तारुण्यावस्थेत येताना होणार्‍या हार्मोनल  बदलांमुळे सतत मूड्स , वर्तवणुक यांत बदल होत असतात.  संतुलित आहारामुळे शरीरात हार्मोन्सचे कार्य सुरळीत राहते. मात्र जंकफूडच्या सेवनाने आवश्यक असलेल्या पोषणद्रव्यांचा आभास निर्माण झाल्याने तरुणांमध्ये नैराश्य 58% नी वाढले आहे.

फास्ट फूडमधील रसायनाचा उपयोग त्यामधील सुगंधाची परिणामकारकता वाढविण्यासाठी केला जातो; परंतु या रसायनाच्या वापरामुळे तोंड, डोके, मान अशा ठिकाणी पाण्याचे प्रमाण वाढते; तसेच त्वचेसंबंधीच्या अनेक तक्रारी वाढतात. शरीर हळूहळू कमकुवत बनत जाण्याचाही धोका असतो. फास्ट फूडसंबंधी अनेक अहवाल आल्यानंतर प्रत्येकाने आपल्या आरोग्याचा विचार करूनच अशा प्रकारच्या पदार्थांच्या सेवनाच्या मर्यादा निश्चित करायला हव्यात.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या