फळांचे शरीराला होणारे फायदे


फळांचे शरीराला होणारे फायदे

हल्ली वेळेचा अभाव असल्याने व्यक्ती झटपट गोष्टी करण्यामध्ये अधिक रस घेतो. पूर्वी थोड्याशा भुकेला पटकन एखादे फळ खाल्ले जात असेल तर हल्ली फास्ट फूड किंवा जंक फूडचा आधार घेतला जातो. हे पदार्थ आपल्या जीवनशैलीचा भाग झाले आहेत. पण, त्याचा शरीरावर दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतो. अनेक विकारांसाठी हे पदार्थ मूळ ठरू शकतात. त्याऐवजी आपण फळे खाल्ल्यास अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. आहार संतुलित असेल तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मोसमी फळांचे अवश्य सेवन करावे, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहेच. या फळांच्या सेवनामुळे आजारांपासून बचाव होतो. निरनिराळ्या प्रकारची फळे खाल्ल्याने ती खाणार्‍यांचे आरोग्य सुधारते आणि त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते कारण फळे ही जीवनसत्त्वे, पोषणमूल्ये, फायबर आणि ऍण्टीऑक्सिडंटस् यांचे साठे असतात. मात्र प्रत्येक फळाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. ते समजून घेऊन आरोग्यासाठी प्राधान्याने कोणती फळे खावीत हे ठरवता आले पाहिजे. सफरचंद हे त्यातील सर्वाधिक फलदायी फळ असून  सफरचंद हे कर्करोग प्रतिबंधक मानले जाते. सफरचंदामध्ये उपलब्ध असलेले औषधी गुणधर्म हे आपले अस्थमा, मधूमेह यापासून संरक्षण करत असते. शिवाय सफरचंद खाल्ल्याने बुध्दीचाही विकास होतो.

भोजन कोणत्याही प्रकारचे असले तरी फलाहाराने मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळते. फळ सेवन केल्यास शरीरवृद्धीसाठी ते खऱ्या अर्थाने फलदायीच ठरते. फळांमधून आपल्या शरीराला आवश्यक असणारी बहुतेक सर्व प्रकारची जीवनसत्त्वे, क्षार, प्रथिने, खनिज, आम्ल इत्यादी घटक मिळण्यास मदत होते.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे फळांमध्ये ८५ ते ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे फळे पौष्टिक आहाराला पूरकच असतात.

फळांमध्ये मोठ्या प्रमाणात 'तंतुमय' म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन - प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन मलविसर्जन क्रिया सुलभ, सुकर होते. शौचास साफ होते. त्यायोगे अपचन होत नाही किंवा अपचनाने पोटात दुखणे, बद्धकोष्ठता, मलावरोध, आतड्यांना व्रण निर्माण होणे इत्यादी विकार जडत नाहीत.

फळांमध्ये भरपूर फायबर किंवा तंतुमय घटक असतात. पण, फळांच्या रसामध्ये तंतुमय पदार्थ नसतात किंवा खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे फळांचा रस पिण्याऐवजी आख्खी फळे खावीत. आरोग्यासाठी आख्खी फळे खाणेच योग्य असते.

आंबा,कलिंगड, चेरी आणि अन्य काही फळात 'बीटा कॅरॉटीन' नावाचे द्रव्य असते. आरोग्य तज्ञांच्या मतानुसार या द्रव्यामुळे कर्करोगापासून बचाव होऊ शकतो. फळात 10 ते15 टक्के मिनरल्स म्हणजेच खजिनद्रव्ये म्हणजेच धातू, अधातू, क्षार असतात. या खजिनद्रव्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, गंधक, फॉस्फरस, लोह, तांबे या धातू मूलद्रव्याचा समावेश होतो. कॅल्शियममुळे हाडांना बळकटी येते. दातांचे आरोग्य चांगले राहते. रक्तात योग्य प्रमाणात कॅल्शियम नसल्यास माणसे चिडक्या स्वभावाची बनतात. मॅग्नेशियम मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास व्यक्तीचा उत्साह मंदावतो. माणसास थकवा जाणवतो. रक्तातील सोडियम अन्नपचनाला मदत करते. पोटॅशियममुळे जखमांच्या वेळी रक्त थिजण्याच्या (क्लॉटिंग) क्रियेला मदत होते. थिजण्याच्या सक्षम क्रियेमुळे रक्तस्त्राव जास्त होत नाही. पोटॅशियम यकृताला उत्तेजित करते. आयोडीनमुळे कंठस्थ ग्रंथीचे आरोग्य चांगले राहते. त्यायोगे थायरॉईड ग्रंथीच्या संबंधित विकार जडू शकत नाहीत. सर्वसमावेषक संतुलित आहारामध्ये सर्व प्रकारच्या फळांचा, मोसमी किंवा बिगरमोसमी, त्याचबरोबर बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड, चारोळी, इ. ड्रायफ्रुटसचा समावेश असणे अगत्याचे आहे.

फळे हि मानवी जीवनाला लाभलेले 'वरदान' आहे. 'फलाहार' हा उत्तम आहार आहे. निसर्ग फळांच्या माध्यमातून मानवी आरोग्याचे रक्षण करतो. फलाहाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपल्या आहारात योग्य ते बदल घडविण्याची जिद्द आपण सर्वांनी बाळगावी.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या