लिंबू पाण्याचे फायदे
लिंबू पाण्याचे फायदे

सदैव ताजेतवाने आणि फ्रेश राहण्यासाठी लिंबूपाण्याचे सेवन नियमित केलेले चांगले. लिंबूमध्ये क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. शरीरासाठी आवश्यक असणारी क जीवनसत्वाची कमतरता लिंबूपाणी सेवनाने भरून काढता येते. दिवसाची सुरूवात लिंबूपाण्याने करणे अतिशय फायदेशीर ठरेल. आपल्या शरीराला क जीवन सत्वाची रोजच आवश्यकता असते त्या प्रमाणात ते शरीरात गेले पाहिजे ह्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे म्हणजेच नियमित लिंबूरस पोटात जायला हवा. रोज लिंबूपाणी घेतल्याने फक्त वजन कमी होणार नाही तर तुम्ही आरोग्याच्या इतर समस्यांपासूनही दूर रहाल. तर आपण आता जाणून घेऊया लिंबूपाणी घेण्याचे काय फायदे आहेत. लिंबूपाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन शरीर साफ होण्यास मदत होते.
हे आहेत लिंबू पाण्याचे फायदे!
1) जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे रोज सकाळी कोमट पाण्यातील लिंबू सरबत प्या. त्यासाठी १ ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून ते मिश्रण कमीत कमी दोन वेळा प्या. प्रत्येक एक तासाने एक ग्लास पाणी प्या. त्यामुळे तुम्हाला भूक कमी लागेल आणि तुम्ही कमी खाल. त्याचबरोबर तुमच्या शरीराचे संतुलन देखील चांगल्या प्रकारे राखले जाईल आणि तुमचे पचनतंत्र देखील चांगल्या प्रकारे सुधारेल.

2) साखरयुक्त पॅकेजयुक्त ज्युस व ड्रिंक्स घेण्याऐवजी लिंबूपाणी पिणे सर्वात उत्तम. लिंबूपाण्यामुळे मधुमेहींना फायदा होतो. कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. शरीर हायट्रेड राहते. व शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. 

3) लिंबूपाणी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच आपल्या शरीराची पोटॅशिअमचीही गरज पूर्ण करते. पोटॅशिअमुळे आपल्या मेंदूला फायदा होतोच आणि ब्लडप्रेशरवरही चांगल्या प्रकारे ताबा ठेवता येतो. तुम्हाला जर चहा कॉफीची सवय कमी करायची असेल तर लिंबूपाणी हा एक उत्तम उपाय आहे. आपल्या शरीरातील रोगप्रतिकार प्रणालीसाठी 'सी' जीवनसत्त्व खूप महत्त्वाचे आहे. लिंबाच्या रसात 'सी' जीवनसत्त्वाचे प्रमाण खूप जास्त आहे. जेव्हा आपल्याला ताण येतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा 'सी' जीवनसत्त्वाचे प्रमाण लवकर घटते. अशावेळेस सदैव उपलब्ध असलेले लिंबू पाणी घेणे हे केव्हाही उत्तम.

4) रोज लिंबूपाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोटाच्या विकारांवरही लिंबूपाणी लाभदायी आहे. पचनक्रिया सुधारण्याबरोबरच लिंबू पाण्यामुळे ऍसिडिटी देखील होत नाही. त्यामुळे जर तुमचे पोट खराब असेल तर लिंबू पाणी पिणे आपल्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. लिंबू पाण्यामुळे रक्त, धमन्या यांतील विषद्रव्य शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे यकृताच्या कार्यात सुधारणा होते. तसेच डोकेदुखी आणि थकव्यावर लिंबूपाणी हा उत्तम उपाय आहे.


5) आजच्या काळात बऱ्याच व्यक्तींना सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी लागतेच. सकाळी ही पेय घेणे आपल्या आरोग्यास  हानीकारक आहेत. त्यामुळे आपण सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्या शरीराला त्याचे खूप फायदे होतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबु हे आम्लधारी असल्यामुळे लिंबाचा रस नुसता न घेता जर तो पाण्यातून घेतला तर ते अधिक चांगले असते. नाश्त्याच्या आधी १५ ते २० मिनिटे आधी लिंबू पाणी पिणे अधिक उपयुक्त असते. ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा संपूर्ण दिवसभर फायदा मिळतो. 

म्हणूनच आपण आपल्या शरीराची योग्य काळजी घेण्यासाठी लिंबाचा उपयोग करून घेतला पाहिजे. लिंबू आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आणि लाभदायक असते. लिंबात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस,क्लोरीन इत्यादी घटकांबरोबर प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि सी देखील असते. 

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या