सर्वांचा आवडता "आंबा"

सर्वांचा आवडता "आंबा" 


लहान मुलांसाठी उंन्हाळ्याची सुट्टी म्हणजे जणू पर्वणीच. वार्षिक परीक्षा सुरु होण्याअगोदरपासूनच लहान मुले सुट्टीमधील योजना बनवायला सुरुवात करतात. सर्वांना सुट्टीमध्ये फिरायला जायची, गावाला जायची, भरपूर खेळायची, मजा मस्ती धमाल करायची असते. पण ह्या सगळ्यांबरोबर त्यांना आपल्या आवडत्या फळाच्या राजाची म्हणजेच "आंब्याची" ओढ लागलेली असते. 
Related image

खरं पाहता, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आंब्याची ओढ लागलेली असते. एप्रिल - मे महिना म्हणजे आंब्याचा हंगाम. ज्याची वर्षभर सर्व जण आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा हा चवीला रुचकर, मधुर आणि रसाळ असतो. हापूस, तोतापुरी, पायरी असे आंब्याचे विविध प्रकार आढळून येतात. आंब्याच्या विविध प्रकारानुसार त्याचा रंग, आकार आणि चव असते. कच्चा आंबा म्हणजे "कैरी". कैरी ही सर्वांची आवडती आहे. कैरीचे लोणचे, पन्हे, आमटी किंवा नुसत्या फोडी तिखट मीठ लावून आवडीने खातात. आंब्याचे विविध पदार्थही आवडीने खाल्ले जातात जसे की, आंबापोळी, आंब्याचे सरबत, आमरस, आंबा वडी इत्यादी.  

हे सगळे पदार्थ तर सर्वांच्या आवडीचे आहेतच, पण नुसता आंबा खाण्यात जे सुख आहे ते कशातच नाही. आंबा हा नेहमी ताजा असावा आणि चोखून खावा. आंबा कापून खाण्यापेक्षा चोखून खाल्लेला चांगला असतो, कारण तो पचायला सहज आणि हलका असतो. तेच कापून खाल्लेला आंबा हा त्यामानाने पचायला जड असतो. त्याचप्रमाणे आंबा चोखून खाल्यामुळे त्यातील रसाचा अर्थात आंब्याचा स्वाद खऱ्या अर्थाने घेता येतो.

कैरी आणि आंबा ह्या दोघांमध्ये औषधी तसेच पौष्टिक गुणधर्म आढळून येतात. आंब्यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, विविध जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ, प्रथिने, आद्रता, मेद, पिष्टमय पदार्थ असे विविध पौष्टिक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. 

असा हा सर्वांचा आवडता, फळांचा राजा "आंबा" ह्याचे आपण आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात:

१) आंब्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

२) आंब्यामध्ये 'अ' जीवनसत्त्व, बीटा कॅरोटिन व अल्फा कॅरोटिन मुबलक प्रमाणात आढळून येतात. आंब्याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते व त्यामुळे दृष्टी उत्तम राहते. तसेच रातांधळेपणा कमी होण्यास मदत होते.

३) उन्हाळ्यामध्ये डोळ्यांची आग होणे, डोळे कोरडे होणे, खाज येणे ह्या प्रकारांनी काही लोकांना त्रास होतो. अशावेळी आंब्याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

४) आंब्यामध्ये फायबर, जीवनसत्व, खनिज व अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. आंब्याच्या सेवनाने आतड्यांचे, स्तनाचे व प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोगापासून वाचण्यास मदत होते. आंब्यामध्ये कॅरोटिन मुबलक प्रमाणात असल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगापासूनही वाचण्यास मदत होते.

५) आंब्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे आंब्याच्या योग्य सेवनाने शरीरातील लोहाची कमतरता भरून निघण्यास मदत होते आणि शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.

६) आंब्यात भरपूर प्रमाणात फायबर असल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. अर्थातच हृदयाशी निगडीत विविध आजारापासून सुटका होण्यास मदत होते.  

७) मेंदूच्या विकासासाठी 'ब' जीवनसत्वाची आवश्यकता असते. आंब्यामध्ये 'ब' जीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्याने आंब्याच्या योग्य सेवनाने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

८) आंब्यामध्ये असणाऱ्या विविध जीवनसत्त्वामुळे आंब्याच्या सेवनाने तरुण दिसण्यास मदत होते, अर्थात चेहऱ्यावर तजेला येण्यास मदत होते.

९) आंब्यामधील पौष्टिक घटकांमुळे आणि फायबरमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते. आंब्याच्या योग्य सेवनाने वजन कमी करण्यास मदत होते.

१०) आंब्याच्या योग्य सेवनाने शरीराला पोटॅशियमचा पुरवठा होत असल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.  

असा हा बहुगुणी आंबा उन्हाळ्यामध्ये आपल्या आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट केल्यास आपल्या शरीराला विविध आरोग्यदायी फायदे मिळवून देतो. म्हणूनच सर्वांनी आवर्जून आंब्याचा आपल्या आहारात योग्य प्रमाणात समावेश करावा आणि आंबा खाण्याचा आंनद लुटावा.  


खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या