चिकूचे हे फायदे आपल्याला माहित आहेत का

चिकूचे हे फायदे आपल्याला माहित आहेत का 


आपल्याकडील बाजारामध्ये हंगामाप्रमाणे विविध प्रकारची फळ आणि भाज्या उपलब्ध असतात. हंगामाप्रमाणे शरीराला आवश्यक असलेले पौष्टिक घटक आपल्याला निरनिराळ्या फळांमधून आणि भाज्यांमधून मिळतात. असेच सहज उपलब्ध असणारे आणि सर्वांचे आवडते फळ म्हणजे "चिक्कू". लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच चिक्कू खायला आवडतात. चिक्कू खाणं सोपं असल्याने आणि चवीला गोड, मऊ असल्याने सर्वच वयोगटासाठी सोयीचं ठरतं. खूप जणांना चिक्कूचा रस प्यायलाही आवडतो. 

Image result for चिकू

चिक्कू हे नैसर्गिक साखरेचे उत्तम स्रोत आहे. चिक्कूमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम अशी विविध खनिज तसेच पिष्टमय पदार्थ, प्रथिने मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्याचप्रमाणे ‘अ’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणावर तर ‘क’ जीवनसत्त्व अल्प प्रमाणात आढळून येते. त्यामुळे चिक्कूच्या सेवनाने ह्या सर्व घटकांचा आपल्या शरीराला फायदा मिळतो.

१) चिक्कू हे शीतल व दाह कमी करणारे फळ असल्याने मळमळ, आम्लपित्त, अतिसार या आजारांमध्ये त्याचे सेवन उपयुक्त ठरते. 

२) चिक्कू हे गोड, श्रमहारक, तृप्तीदायक, दाहनाशक असल्याने थकवा आलेल्या लोकांना किंवा कामाच्या ताणामुळे दमलेल्या लोकांना चिक्कू खाल्ल्याने त्वरित नवी ऊर्जा प्राप्त होण्यास मदत होते. आणि अशी लोक परत आपल्या कामाला उत्साहाने लागतात.

३) लहान मुलांनासुद्धा अभ्यास आणि खेळानंतर शारीरिक व मानसिक थकवा येतो, तेव्हा त्यांना चिक्कू खायला दिल्यास मुलांमध्ये  आल्यानंतर नवा उत्साह व शक्ती संचारायला मदत होते. कारण चिक्कूमध्ये नैसर्गिक साखरेचे उत्तम स्रोत असल्याने ती रक्तात मिसळून पटकन थकवा घालवण्यास हातभार लावते. 

४) चिक्कू खाल्ल्याने शरीरातील आतडय़ांची कार्यक्षमता वाढते आणि ती सुदृढ होण्यास मदत होते.  

५) रक्तदाब कमी असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे चिक्कूचे सेवन केल्यास रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. 

६) ज्यांना वरचे वर चक्कर येण्याचा त्रास होत असेल किंवा शरीरातील साखरचे प्रमाण कमी होत असेल अशा व्यक्तींनी नियमितपणे चिक्कू खाणे उपयुक्त ठरते. कारण चिक्कूमध्ये नैसर्गिक साखरेचे उत्तम स्रोत असल्याने ती शरीरातील रक्तामध्ये त्वरित शोषली जाऊन चक्कर, थकवा अथवा ग्लानी ही लक्षणे कमी होण्यास मदत होते.

७) चिक्कूमध्ये असणाऱ्या आद्रता व तंतुमय घटकांमुळे ज्या लोकांना पोट साफ होण्यास त्रास होतो, अशांनी रात्री झोपताना व सकाळी उठल्याबरोबर चिक्कू खाल्ल्यास  त्यांना शौचास साफ होण्यास मदत होते.

८) बरेच वेळा तापामध्ये किंवा आजारपणामध्ये आपल्या तोंडाची चव जाते, कुठलेही जेवण बेचव लागते. अशावेळी चिक्कू खावा, कारण चिक्कूतील गोडव्याने तोंडाची चव परत निर्माण होण्यास मदत होते. 

९) चिक्कूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोहसारखी खनिज मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे चिक्कूच्या नियमित सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

१०) चिक्कूमध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असल्याने चिक्कूच्या नियमित सेवनाने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. चिक्कूमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असल्याने त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसेच केस मुलायम होतात आणि केसगळती कमी होण्यास मदत होते.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या