नवीन माहिती मिळाल्यामुळे आपल्या ज्ञानात नेहमीच भर पडते

नवीन माहिती मिळाल्यामुळे आपल्या ज्ञानात नेहमीच भर पडतेलहान मुलांकडूनही बरंच काही शिकण्यासारखं असत. स्वतःला हवी असलेली वस्तू मिळेपर्यंत लहान मुलं शांततेने किंवा आपल्या मागे लडिवाळपणे तगादा लावून हवी असलेली वस्तू मिळवतात. 
त्या दरम्यानं आपण त्याच्यावर कितीही रागावलो तरी ते आपला हट्ट म्हणा किंवा मागणी म्हणा मागे घेत नाही. जर आपण आपला विचार केला तर आपल्याला जाणवेल आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची पूर्तता होतं नसल्यास, हे घडणारच नाही अशी स्वतःची समजूत करून घेतो व त्या गोष्टीचा नाद सोडून देतो.
पण लहान मुलं त्यांना मिळेपर्यंत विविध शक्कल लढवून आपल्याला हवी असलेली गोष्ट ती पण आनंदाने आपल्याकडून मिळवतात. बऱ्याच वेळा जर आपलं कुणाशी भांडण झालं किंवा काही वाद झाला तर आपण त्या व्यक्तीबरोबर अबोला धरतो, त्यांच्याशी नीट वागत नाही, आपण कुणाला पटकन क्षमा करू शकत नाही.
तेच जर तुम्ही लहान मुलांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल त्याचं जर कोणाबरोबर भांडण झालं तर दुसऱ्या क्षणाला ते विसरून त्या व्यक्तीबरोबर पाहिल्यासारखे सहज मिसळून जातात. आपणही कधी कधी रागाच्या भरात मुलांना ओरडतो, ते ऐकत नाही म्हणून आपली चिडचिड होते. आपल्या डोक्यातून हा राग पटकन जात नाही, पण मुलं मात्र दुसऱ्या क्षणाला सार काही विसरून आपल्याशी नीट वागतात. खरंच लहान मुलांकडून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
वयाची मर्यादा न बाळगता आपल्याला जे आवश्यक आहे, जे आपल्या ध्येयाप्रती गरजेचे आहे किंवा जे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोगी आहे ते शिकण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. ज्या गोष्टी शिकून आपल्या ज्ञानात भर पडून आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात त्याचा आपल्याला फायदा होणार असल्यास अशा गोष्टी शिकण्यासाठी कधीच वयाचं आणि वेळेचं बंधन न बाळगता ती नवीन गोष्ट शिकण्याची आपली तयारी असली पाहिजे.

सतत काहीतरी नवीन शिकण्याने आपल्या मनाला ताजेतवाने वाटते. नवीन माहिती मिळाल्यामुळे आपल्या ज्ञानसागरात भर पडते, त्याचा उपयोग आपल्याला आपल्या समस्या सोडविण्यासाठी होतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये "आता काय करू?" असा प्रश्न न पडता आपल्याकडे असलेल्या ज्ञानातून, माहितीतून त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मार्ग काढायला मदत होते. वयाची कुठलीही मर्यादा न पाळता सतत काहीतरी नवीन शिकून आपल्या ज्ञानात जरूर भर घाला.

खालील लिंकवर क्लिक करून आमचे इतर ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या