मुलांनो टेन्शनला करा दूर

मुलांनो टेन्शनला करा दूर 

हल्लीच्या मुलांना परीक्षा म्हटलं की, पोटात गोळा येणं, हात-पाय थरथरणं, झोप न लागणं अशी सगळी टेन्शनची लक्षणं दिसू लागतात आणि याचे मूळ कारण हे आजची बदललेली जीवनशैली आहे पण या टेन्शनला आपण सहज दूर करो शकतो आणि ह्यासाठीच मी इथे तुम्हाला काही टिप्स देणार आहे ज्याने तुमचे टेन्शन नक्कीच दूर होईल. सध्याच्या स्पर्धात्मक आणि अभ्यासपूर्ण वातावरणात शाळा आणि कॉलेजांमध्ये परीक्षांचं टेन्शन हे येतंच त्यामुळे हृदयाचे ठोके वाढणं, पोटात गोळा येणं, झोप न लागणं, भूक न लागणं किंवा प्रमाणापेक्षा जास्त खाणं यासारखी लक्षणं दिसून येतात.

ज्याप्रमाणे तुमचे शिक्षक परीक्षेचं वेळापत्रक बनवून सांगतात त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करून रोज शाळेत काय शिकवलं त्याची घरी आल्यावर उजळणी करण्याची सवय स्वत:ला लावा. शाळेतून किंवा शिकवणीतून तुम्हाला जे काही नोट्स मिळतात त्यांचा व्यवस्थित संग्रह करा आणि रोज त्या नजरेखालून घाला.

अभ्यासाचं वेळापत्रक बनवा

परीक्षेच्या आदल्या रात्री जागून अभ्यास तुमच्या आरोग्यासाठी अयोग्य ठरू शकते त्यापेक्षा यापेक्षा दररोज वेळेचं व्यवस्थित नियोजन करुन अभ्यास करण्यावर भर द्या आणि साधारण ५० मिनिटे अभ्यास आणि त्यानंतर १० मिनिटांचं ब्रेक असं तुमचं अभ्यासाचं वेळापत्रक बनवून ब्रेकमध्ये पौष्टिक खा, थोडावेळ टिव्ही बघा किंवा एक फेरफटका मारुन या. प्रत्येक विषय नीट समजून पाठांतरापेक्षा त्यामधील संकल्पना समजून घेऊन अभ्यास करा. अभ्यासासाठी जिथे कमी आवाज आणि तुमचं लक्ष विचलित होणार नाही अशी जागा निवडा.


तब्येत सांभाळा

हल्लीची मुले ही मैदानी खेळ कमी आणि कॉम्पुटर आणि मोबाइल वर जास्त वेळ घालवताना दिसतात, ह्या गोष्टी टाळून जर थोडा व्यायाम आणि पौष्टिक अन्नाचं सेवन केले तर एकाग्रता वाढून चांगला अभ्यास होतो, हे काही सर्वेक्षणाद्वारे सिद्ध झालं आहे. टेन्शन किंवा एखाद्या गोष्टीचा ताण असला की काहीतरी चटपटीत खाण्यापेक्षा पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर द्या आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे पुरेशी झोपही काढा.


नेहमी उजळणी करा

कंटाळा टाळण्यासाठी मित्र-मैत्रिणींबरोबर सातत्याने अभ्यासाची उजळणी करा म्हणजे परीक्षेच्या वेळेस दडपण कमी होईल.

सकारात्मक विचार करा.

ह्यामध्ये आईवडिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असून जर ते मानसिक दृष्ट्या स्टेबल / प्रबळ  असतील तर ते आपल्या मुलांना सकारात्मक विचार देऊ शकतील कारण टेन्शनमुळे तुमच्या मुलांच्या मनात जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार येतील तेव्हा सकारात्मक विचार करण्यास पालकांनी नेहमीच त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. अगदी सहज सोपा उपाय म्हणजे ताण हलका करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या आणि तो हळूवार सोडा ज्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळेल. आपल्या शालेय जीवनातील यशाची कल्पना केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा नक्की मिळेल.

परीक्षेच्यावेळी हॉलमध्ये


परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका हातात आल्यावर सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून मग त्यामधील सर्व प्रश्न नीट वाचा, ते वाचल्याने तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवायला साधारण किती वेळ लागेल याची कल्पना येईल. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगल्याप्रकारे येतं, तो प्रश्न आधी सोडवा आणि जर टेन्शन आलंच तर दीर्घ श्वास घेऊन सकारात्मक विचार करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या