हरवत चाललेली स्मरणशक्ती

हरवत चाललेली स्मरणशक्ती 


आजच्या टेक्नोलॉजि वर्ल्ड मधील लोकांचे खास वैशिष्ट्य म्हणजे आजच्या पिढीला स्मरणशक्ती कमीत कमी वापरावी लागते. मित्रांपासून ते आवश्यक टेलिफोन नंबर, घराचे पत्ते, वाढदिवसाच्या तारखा, जमा-खर्च, टेलिफोन किंवा विजेची बिलं भरायच्या तारखा, अनेक गोष्टींच्या नोंदी आता संगणकावर किंवा मोबाइलवर स्टोअर करून ठेवल्या जात आहेत. जशी गरज लागेल तशी माहिती एका क्लीकवर सहज उपलब्ध होते त्यामुळे कोणत्याही गोष्टी लक्षात ठेवण्याची किंवा पाठ करण्याची गरजच भासत नाही.


आज जगभरात विविध क्षेत्रात माहितीचा एवढा प्रचंड जागतिक साठा केवळ मोबाईलच्या एका क्लीकवर उपलब्ध होतो की एवढी सर्व माहिती मेंदूच्या एखाद्या कप्प्यात बंदिस्त करून ठेवणं म्हणजे खूपच जिकरीचे काम आहे. पूर्वीच्या काळी लोकांना इतरांची नवे, अंकगणित तसेच फोन नंबर अगदी सहजच लक्षात राहायचे पण सध्या आपल्याला भेटणाऱ्या असंख्य लोकांची नावं तसेच फोन ध्यानात ठेवणं कठीण होत चालले आहे. सध्याच्या आधुनिक युगात सर्वच जण बरेचसे ज्ञान वरवर जाणून घेतो आणि माहिती म्हणून संगणकात किंवा मोबाइलमध्ये साठवून ठेवतो.सध्याच्या युगात आपल्याल्या विविध माध्यमांद्वारे आवश्यक आणि अनावश्यक माहिती सहजच उपलब्ध होत आहे शिवाय फेसबुक, व्हॉट्सॅप, गुगल अशा अॅप्समधून होणाऱ्या तथाकथित ज्ञानाचा भडीमार प्रत्येक मिनिटामिनिटाला होतच असतो.
माहिती आणि ज्ञानाच्या या वर्षावामुळे सर्वच गोष्टी आपण सध्या मोबाइल आणि संगणकावर साठवून ठेवत आहोत त्यामुळेच समोर आलेल्या माहितीचा पुरेसा अभ्यास काही काळ करून ती मेंदूमध्ये साठवण्याऐवजी, तत्परतेनं त्वरित संगणकात साठवली जाते. 

ह्या सध्याच्या जीवनशैलीमुळे जीवनातल्या साध्यासुध्या गोष्टीतला विसराळूपणा सगळ्याच वयोगटात वाढत चालला आहे आणि ह्यामध्ये विविध बिलांच्या तारखा विसरण्यापासून, ते आज नक्की कोणता वार आहे आणि आज कुठलं महत्त्वाचं काम करायचं होतं, हे विसरण्यापर्यंत स्मरणशक्तीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव आणखीन वाढण्याची परिस्थिती सध्याच्या पिढीमध्ये प्रकर्षाने निर्माण होताना दिसते आहे. परंतु ह्यावरही आपण सहज मात करू शकतो त्यासाठी काही सोपे उपाय नक्कीच करता येतील.

ध्यानधारणा  

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये एखाद्या योगीपुरुषासारखं तासनतास ध्यान लावून बसणं, सध्याच्या काळात तरी अशक्य आहे पण अगदी कामाच्या वेळेत, पाच-दहा मिनिटं का होईना ध्यान, श्वसननियंत्रण किंवा रिलॅक्सेशन टेक्निक्स, यापैकी एखादी गोष्ट नियमितपणे अमलात आणली तर ह्याचा नक्कीच दूरगामी चांगला परिणाम होऊन सैरभैर मन शांत होऊन विसराळूपणा आटोक्यात येण्यास नक्कीच मदत होईल ह्यात तिळमात्र शंका नाही.

 

एकाग्रता

दैनंदिन जीवनातल्या महत्वाच्या गोष्टी, भेटणारी माणसे, त्यांची नावे, नंबर याकडे जर एकाग्रतेनं आणि थोडा वेळ देऊन मनन केलं, तरी खूप फरक पडू शकतो. तसेच शक्य असल्यास अनावश्यक गोष्टी पाहणं, ऐकणं हेसुद्धा टाळावं उदाहरणार्थ चॅटिंग, नेट सर्फिंग इत्यादी.

 

स्मरणतंत्रं  

स्मरण तंत्रात आपण खूप काही गोष्टी एखादे यमक जुळवून लक्षात ठेवू शकतो जसे की, संतोष नावाची व्यक्ती लक्षात ठेवायची असेल, तर ‘जय संतोषी मां’ अशा प्रकारे आपण त्या नावाभोवती सोपे शब्द जोडू शकतो किंवा पंचवीस तारखेला महत्त्वाची अपॉइंटमेंट असेल, तर ‘वेताळ पंचविशी’ असं वरवर वेडगळ वाटणाऱ्या कल्पना मनोमन ठरवून घेतल्यास खूप गोष्टी पक्क्या स्मरणात राहण्यासाठी खूपच मदत होईल.

 

डायरीमध्ये नोंद ठेवणं

महत्त्वाच्या कामाला जाताना आवश्यक गोष्टी विसायला होणे म्हणजे काही नवीन नाही यासाठीच जर रोजची कामं, दिलेल्या वेळा, बिलांच्या तारखा इत्यादी भारंभार गोष्टींची डायरीत किंवा मोबाइल कॅलेंडरवर नोंद करून ठेवली तर त्याचा खूपच फायदा होऊ शकतो त्यातही कामाला निघण्याआधी ठराविक वेळी ती नोंद जर नजरेखालून घातली तर गोष्टी सहजच लक्षात राहू शकतात.


Regards


Post a Comment

0 Comments