कॉर्पोरेट जगात वावरताना...

कॉर्पोरेट जगात  वावरताना...


सध्या आपण सर्वच क्षेत्रात स्पर्धात्मक युग पाहत आहोत आणि सध्याची स्पर्धात्मक परिस्थिती ही कॉर्पोरेट विश्वात देखील प्रकर्षाने दिसून येत आहे अशा तणावपूर्ण वातावरणात कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक कंपन्या पुढे सरसावून कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार करत आहेत जेणेकरून त्या कंपन्यांची उत्पादन क्षमता आपोआपच वाढेल तर याविषयी थोडे जाणून घेऊया:


कॉर्पोरेट जगतात वावरताना आणि काम कराताना अगदी लहान पोझिशन पासून ते अगदी वरच्या लेव्हल पर्यंत प्रत्येकालाच टार्गेट पूर्ण करण्याचं टेन्शन, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपड करावी लागत आहे आणि ह्यामुळे त्यांना मानसिक ताणाला देखील सामोरं जावं लागत आहे. कंपनीमधल्या कर्मचाऱ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आणि एकूणच ऑफिसामधल्या अनुकूल वातावरणावर त्यांची निर्णयक्षमता, उत्पादनक्षमता अवलंबून असते ह्याचे प्रमुख कारण म्हणजे ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना उत्तम काम करण्यास मानसिकदृष्ट्या पोषक वातावरण असल्यास कंपनीला त्याचा फायदा होण्यास मदत होते.

 

पोषक, अनुकूल वातावरणाची आवश्यकता ही तर काळाची गरज

सध्याच्या युगात मानवाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडण्यामागे जरी त्यांची रोजची जीवनशैली कारणीभूत असली तरी व्यक्तीच्या आजूबाजूचं वातावरणही तेवढंच कारणीभूत असतं म्हणूनच उद्योग लहान असो व मोठा त्या प्रत्येक ठिकाणी कर्मचारी काम करतात त्या ठिकाणी काम करण्यास पोषक वातावरण आहे की नाही, हे कंपनीने तपासणं गरजेचं आहे. साधारणपणे नोकरी करणारे हे आपल्या दिवसातील ७०% भाग हा ऑफिसमध्ये किंवा काम करण्याच्या ठिकाणी घालवतात. त्यामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असणं अत्यंत गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांमधील काम करण्याचा उत्साह वाढवण्यासाठी किंवा त्यांचे मानसिक स्वास्थ सुधारण्यासाठी कंपन्यांनी दर काही दिवसांनी ट्रैनिंग प्रोग्रॅम किंवा काही अॅक्टीव्हिटी करुन घेणे आवश्यक आहे. ह्यासाठी काही व्यायामप्रकाराशी संबंधीत मार्गदर्शन किंवा आपला दिनक्रम कसा असावा ह्याविषयी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे जेणेकरुन कर्माचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची योग्य ती काळजी घेतली जाईल.


कर्मचाऱ्यांना मनोविकारांची माहिती असणे आवश्यक आहे


आज अनेक प्रौढ व्यक्ती ह्या आयुष्यात एकदा तरी मनोविकाराला सामोरी जात आहेत आणि किंबहुना आपण एखाद्या मनोविकाराला सामोरे जात आहेत हे कित्येकजणांना कळतही नाही. अशावेळी मनोविकाराची लक्षणं आणि त्यातून निर्माण होणारे पुढील धोके याची माहिती कर्मचाऱ्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यशाळेतून देणं आवश्यक आहे. तसेच कंपनीने वेळोवेळी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संपर्कात राहून आपल्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनपर कार्यशाळा घेणं काळाची गरज बनली आहे आणि बऱ्याच कंपन्या ह्या अशा कार्यशाळांना हल्ली महत्व देऊ लागल्या आहेत.


मानसिक स्वास्थ्यासंबंधित मार्गदर्शनाची गरज


शारीरिक फिटनेसवर काम करता येऊ शकते, हे तर सर्वच जाणतात परंतु मनोविकारांवरही योग्य ते उपाय करता येऊ शकतात, हा विश्वास कर्मचाऱ्यांना देणं हे आजच्या घडीला गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासंबंधित समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम कंपनीलाच भोगावे लागू शकतात त्यामुळे कंपनीने वेळोवेळी ठोस पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे.


माझ्या ह्या लेखातून मला हेच सुचवायचे आहे की लहान असो वा मोठा उद्योग त्या कंपनीच्या वरिष्ठ लोकांनी आपल्या कंपनीचा कामाचा दर्जा उंचावण्यासाठी जर योग्य ती पावले उचलली तर एम्पलॉय सुद्धा त्या कंपनीसाठी दीर्घ काळ आपले जीवन वाहून घेईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या